भोसरी, पिंपरी, रुपीनगरसह देशातील १५०० हून अधिक केंद्रांवर योग शिबिरांचे आयोजन
पिंपरी,(हिंदवी न्यूज)-‘निरोगी शरीर, निर्मळ मन आणि सजग आत्मा’ या संकल्पाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी संत निरंकारी मिशन च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने व्यापक योग व आध्यात्मिक चेतना अभियान आयोजित करण्यात आले आहे. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार असून आरोग्य व आत्मिक उन्नती यावर या उपक्रमात भर देण्यात येणार आहे.
संत निरंकारी मिशनतर्फे रविवार दि., 21 जून रोजी सकाळी सहा वाजता पुणे जिल्ह्यातील मिशनच्या सत्संगभवन भोसरी, पिंपरी, रुपीनगर यासह देशातील १५०० हून अधिक केंद्रांवर एकाच वेळी योग शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. मिशनच्या विविध शाखांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोकळ्या मैदानांमध्ये व उद्यानांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये श्रद्धाळू, सेवादल स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत.
या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे “स्वस्थ जीवनासाठी योग”. खरे आरोग्य केवळ रोगमुक्त शरीरापुरते मर्यादित नसून मानसिक स्थैर्य, भावनिक परिपक्वता, सामाजिक समरसता आणि आध्यात्मिक जागरूकता यांचा समन्वय आहे. या दृष्टिकोनातून संत निरंकारी मिशन योगाला जीवनात संतुलन, सकारात्मकता आणि आत्मजागरूकतेचे प्रभावी साधन मानून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव जोगिंदर सुखीजाजी यांनी सांगितले की २०१५ पासून फाउंडेशनतर्फे ‘योग दिवस’ हा राष्ट्रव्यापी अभियान नियमितपणे राबवला जात आहे. योग ही भारताची प्राचीन आणि गौरवशाली परंपरा आहे, जी केवळ शरीर मजबूत करत नाही तर मनाला स्थिरता, विचारांना सकारात्मकता आणि आत्म्याला चेतना प्रदान करते. नियमित योगाभ्यासामुळे तणाव आणि जीवनशैलीशी संबंधित समस्यांवर नियंत्रण मिळवता येते आणि व्यक्तीला आत्मिक समाधान, मानसिक आनंद प्राप्त होतो. असे ते यावेळी म्हणाले.
![]()
