पुणे, (हिंदवी न्यूज)- जागतिक योग दिनानिमित्त पुणे बार असोसिएशन तर्फे शिवाजीनगर जिल्हा न्यायालय येथे वकील वर्गासाठी विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वकिलांच्या दैनंदिन व्यस्त जीवनात त्यांचे आरोग्य, मानसिक संतुलन आणि तणावमुक्त जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात साविता खानापुरे, (Savi’s Yoga) तसेच श्रद्धा धनवे यांनी योगा सेशन्स घेतले. यात त्यांनी विविध योगासने, श्वसनक्रिया आणि दैनंदिन जीवनात करता येणाऱ्या सोप्या योगप्रकारांचे मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे होणारे लाभ, कामातील एकाग्रता आणि तणाव कमी होण्यास योगसाधना मुळे कशी मदत होते, याबद्दल योग प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राम भुजबळ यांनी योगाचे महत्त्व सांगितले. वकिलांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून संतुलित आरोग्यासाठी वेळ काढणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा प्रभावी मार्ग आहे, असे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी उपाध्यक्ष अॅड. कांताराम नप्ते, अॅड. प्रताप मोरे, सचिव अॅड. सम्राट जांभुळकर, अॅड. अभिजित पोळ, खजिनदार अॅड. अंजली बांदल, ऑडिटर अॅड. शिवराज निंबाळकर, अॅड. पूजा पवार तसेच सदस्य अॅड. अनिल हुडे, अॅड. स्मिता वाघमारे, अॅड. गुंजन भोसले व पुणे बार असोसिएशनचे सभासद उपस्थित होते. या उपक्रमाला वकील वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष अॅड. प्रीतिसिंह परदेशी यांनी केले, सचिव अॅड. नेहा जांभळे सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
![]()
