हिंदवी न्यूज | पुणे
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या सात तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यम तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्या बंद राहणार आहेत.
घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.तथापि, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेहमीप्रमाणे शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कामकाज पार पाडावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
![]()
