हिंदवी न्यूज | पिंपरी
शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्याकडून नागरिक, महिला व लहान मुलांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांकडून नागरिक, महिला तसेच लहान मुलांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच चिखली परिसरात एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी एकत्रितपणे हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. तसेच रावेत येथील सिटी प्राईड शाळेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका महिला व मुलीचा पाठलाग करून त्यांना खाली पाडले. त्यांच्या कपड्यांना तोंडाने ओढण्याचा प्रयत्न केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा घटनांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळा, उद्याने, सोसायट्या, बाजारपेठा तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके दिसून येत आहे. त्यामुळे लहान मुलांना एकट्याने रस्त्यावर सोडणेही पालकांना धोकादायक वाटत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तातडीने शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे निर्बीजीकरण (ABC) तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणावर व प्रभावीपणे करावे. नागरिक, विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक कुत्र्यांबाबत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.
शहरातील संवेदनशील ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, उद्याने व रहिवासी परिसरांमध्ये विशेष पथके नियुक्त करून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या तक्रारीं साठी प्रभावी हेल्पलाईन व तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी यासह नागरिकांच्या जीविताची व सुरक्षिततेची जबाबदारी महापालिकेची असून, गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने ठोस कार्यवाही करावी. तसेच पशुवैद्यकीय विभागाला आवश्यक सूचना देऊन संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांना होणारा धोका कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी विठ्ठल (नाना) काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


