मराठी पत्रकार संघाच्या जीवनगौरव पुरस्काराने अम्मांचा सन्मान; मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
हिंदवी न्यूज |
पिंपरी-चिंचवड : “मराठी पत्रकार संघाने दिलेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या लेकरांनी दिलेला पुरस्कार आहे. माझी लेकरं हाच माझा सर्वात मोठा पुरस्कार असून, जगाला निःस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या या लेकरांना मी हा पुरस्कार समर्पित करते,” अशा भावपूर्ण शब्दांत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आध्यात्मिक गुरू तथा विश्वमाता माता अमृतानंदमयी (अम्मा) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठी पत्रकार संघाच्या वतीने निगडी येथे शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) आयोजित सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अम्मांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला आमदार महेश लांडगे, दैनिक सकाळच्या संपादक शीतल पवार, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या भाग्यश्री पाटील, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, व्हीजे डेव्हलपर्सच्या अस्मिता जावडेकर, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
अम्मा म्हणाल्या, महाराष्ट्र ही संत-महात्म्यांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याग व देशभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांचे योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजात धर्मभावना आणि नैतिक मूल्ये टिकवून ठेवण्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकारांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, यासाठी मी प्रार्थना करते. अत्यंत विनम्र भावनेने हा पुरस्कार स्वीकारत असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, महिलांना स्वावलंबी बनविण्याबरोबरच विकसित राष्ट्र घडविण्याच्या कार्यात अम्मांचे योगदान मोठे आहे. मायेचा अथांग सागर असलेल्या माता अमृतानंदमयी यांचा हा सत्कार म्हणजे कृतज्ञता सोहळा आहे. विश्वकल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अम्मांना मी वंदन करतो.
अम्मांच्या मायेचा स्पर्श कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचला आहे. दुःखात असलेल्या लोकांना अध्यात्माने आधार दिला पाहिजे, या विचारातून अम्मांनी अध्यात्माला समाजसेवेचे स्वरूप दिले आणि करुणेला चळवळीचे रूप दिले. सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून त्या कार्य करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही त्यांनी मोठा मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या महान कार्याला मी वंदन करतो. पुणे ही संतांची भूमी असून या संतभूमीत अम्मांचे स्वागत करताना आनंद होत असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी केले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर विवेक इनामदार यांनी आभार मानले.
———
अम्मा म्हणजे प्रेम, करुणा व मानवतेची मूर्ती – मुख्यमंत्री
मराठी पत्रकार संघाने माता अमृतानंदमयी यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविले. गडचिरोलीतील कार्यक्रमामुळे उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशातून शुभेच्छा दिल्या. माताजींचे जीवन हे धर्म, जात, भाषा यांच्या पलीकडे जाऊन केवळ मानवतेसाठी समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेम, करुणा, ममता आणि निःस्वार्थ सेवेने त्यांनी असंख्य लोकांना नवी आशा दिली. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि आपत्ती काळातील सेवेसह पर्यावरण क्षेत्रातील त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.









