हिंदवी न्यूज | पुणे
लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवत ४२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी प्रतीक बाबूलाल मुंद्रा याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुचेता टाकळीकर यांनी हा आदेश दिला. मुंद्रा विरोधात प्रथमदर्शीनी पुरावा उपलब्ध असून त्याविरूध्द यास्वरुपाचा आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याने त्याच्याकडून पुन्हा गुन्हा करण्याची तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर येरवडा कारागृहात असलेल्या त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यास सरकार पक्षासह पिडीतेतर्फे अॅड. मुकुंद महिंद्रकर यांनी विरोध केला. आरोपी हा विवाहित आहे. फिर्यादीशी लग्नाचे आश्वासन देऊन संबंध ठेवणे आणि त्यानंतर मोठी रक्कम स्वीकारून लग्नास नकार देणे, ही बाब गंभीर आहे. लग्नाचे आमिष दाखवून खोटी आश्वासने देत त्याआधारे आर्थिक लाभ घेतला आहे. त्याविरोधात एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याने फिर्यादीकडून घेतलेली रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. त्यामुळे, त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी अॅड. महिंद्रकर यांनी केली. न्यायालयाने बचावपक्षासह सरकार पक्ष आणि फिर्यादिपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत जामीन फेटाळून लावला.
याप्रकरणी, हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीने फिर्यादिला लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत आर्थिक अडचण असल्याचे सांगून फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत फिर्यादीकडून बँक खात्यात व ऑनलाइन व्यवहारांद्वारे तब्बल ४१ लाख ९९ हजार ७५० रुपये घेतले. आरोपी आधीपासून विवाहित असल्याचे समोर आल्या नंतर त्याने लग्नास नकार दिल्याचे फिर्यादित नमूद आहे.


