हिंदवी न्यूज | पिंपरी
मा. महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे श्री. ए. टी. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18 जुलै 2026 रोजी परक्राम्य लिखत अधिनियम, 1881 (Negotiable Instruments Act, 1881) च्या कलम 138 अंतर्गत दाखल प्रकरणांच्या तडजोडीकरिता विशेष लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय, पुणे येथे करण्यात आले.
या विशेष लोक अदालतीसाठी एकूण 15 लोकअदालती पॅनल (Benches) स्थापन करण्यात आली होती. या विशेष लोक अदालती मध्ये प्रलंबित 3,742 प्रकरणे सुनावणीस घेण्यात आली. त्यापैकी 201 प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधील एकूण दावा रक्कम ₹5,66,86,463/- इतकी असून, तडजोडीद्वारे ₹5,75,31,680/- इतक्या रकमेवर समझोता करण्यात आला. विशेष लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व न्यायिक अधिकारी, पॅनेल सदस्य, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
परक्राम्य लिखत अधिनियम, 1881 च्या कलम 138 अंतर्गत पुढील विशेष लोकअदालत दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतचा जास्तीत जास्त पक्षकारानी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे चे सचिव रेवती रा. देशपांडे यांनी केले आहे.


