यंदाही मूलींनी मारली बाजी.
हिंदवी न्यूज (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा (SSC) निकाल आज (दि. ८ मे २०२६) जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ९२.०९% लागला आहे. कोकण विभाग ९७.२४% निकालासह राज्यात अव्वल ठरला असून यंदाही मुलींनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे.
राज्यात यंदा एकूण १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांचा निकाल ८९.५६ टक्के एवढा लागला. तुलनेने मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी जास्त असल्याचे पहायला मिळाले. खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७६.३३ टक्के लागला असून २८ हजार ८२५ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ३३.७९ टक्के लागला असून यात २८ हजार ८६७ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ७५७ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले.
विभागनिहाय तपशील
विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने ९७.६२ टक्के निकालासह राज्यात प्रथम स्थान कायम राखले. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागाचा ९५.४७ टक्के आणि पुणे विभागाचा ९४.२४ टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ९४.१७ टक्के, नाशिक विभागाचा ९०.५३ टक्के, अमरावती विभाग ९०.५० टक्के, नागपूर विभाग ८९.०७ टक्के, लातूर विभाग ८८.४२ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा ८८.४१ टक्के इतका निकाल लागला आहे.
पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी सुविधा उपलब्ध
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल त्यांनी गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी म्हणजेच रिव्हॅल्यूएशनसाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत विहित शुल्क भरून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावरून पुनर्मूल्यांकनासाठी मागणी करता येईल.
निकाल पाहण्यासाठी लिंक (SSC Result 2026 Direct Links):
- https://sscresult.mahahsscboard.in/
- https://results.digilocker.gov.in
- https://mahahsscboard.in
- https://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
![]()
