हिंदवी न्यूज | पुणे
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा व आर्थिक तसेच प्रवासाच्या अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने फिनिक्स अग्निशिखा फाऊंडेशनतर्फे ५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. गोखले इन्स्टिट्यूटच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये १३ मुली आणि ३७ मुलांना सायकलींचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे फाऊंडर डायरेक्टर मंगेश शिगवण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सदस्य चेतनदादा वाघ, अमोल जरांडे, जय गवळी, दिनेश सकट,चेतन गोंडाळ, राकेश थोरात, मनीषाताई परांडे आणि रेणुकाताई पाटील उपस्थित होते.
यावेळी रेणुकाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,”Phoenix Agnishikha Foundation हा केवळ सायकल वाटपाचा उपक्रम नसून समाजाप्रती असलेल्या सेवाभावाचे प्रतीक आहे. आज आपल्या लहान भावंडांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून आमचा सेवाभाव द्विगुणित झाला आहे. काही लोकांना सामाजिक कार्य हे प्रसिद्धीसाठी केले जात असल्याचे वाटू शकते; मात्र आमच्यासाठी हे कार्य प्रसिद्धीचे नसून आत्मिक समाधानाचे आहे.”
संत एकनाथ महाराजांनी काशीहून रामेश्वरला कावड घेऊन जात असताना वाटेत तहानेने व्याकूळ झालेल्या गाढवाला कावडीतील पाणी पाजून भूतदयेचा आदर्श घालून दिला. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी आपल्या कार्यातून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.या महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. ‘भूतदया हा श्रेष्ठ धर्म आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचारातूनच फाऊंडेशनचे कार्य सुरू असल्याचे रेणुकाताई पाटील यांनी नमूद केले.
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात, या भावनेतून फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. फिनिक्स अग्निशिखा फाऊंडेशनच्या वतीने शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गरजू विद्यार्थी आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने फाउंडेशन भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविणार आहे.









