शहर स्वच्छतेचा संदेश कृतीतून साकार
पिंपरी(हिंदवीन्यूज)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ कोयनानगर येथे आयोजित करण्यात आलेला प्लॉगाथॉन उपक्रम उत्साहात पार पडला. शहर स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात उपायुक्त संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहा. आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक गौरव दराडे, महेंद्र साबळे, समाधान कातड, रामचंद्र शिंगाडे यांच्यासह सुमारे २५० ते ३०० नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत परिसरातील कचरा गोळा केला. स्वच्छता हीच खरी जबाबदारी हा संदेश नागरिकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला.
या उपक्रमामध्ये विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, फिटनेस गट तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामध्ये गणगे प्रशाला विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, गणेश इंटरनॅशनल स्कूल, एक्सपायर अकॅडमी, ओमसाई फिटनेस क्लब, सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ, आदर्श क्रांती सामाजिक संस्था, विद्याव्हेली कॉलेज, सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, दामोदर हरीश चाफेकर औद्योगिक प्रशिक्षण कॉलेज, माऊली संगीत विद्यालय, डी. वाय. पाटील कॉलेज, भगवती बचत गट, जॉगर्स पार्क ग्रुप इत्यादींचा समावेश होता.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून, पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा स्वच्छतेच्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.
