पिंपरी,(हिंदवी न्यूज )-पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार संजय मराठे यांची मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे आयोजित मराठी पत्रकार संघाच्या महाअधिवेशन २०२६ दरम्यान संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या भव्य अधिवेशनाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, विधान भवनाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रसिद्ध प्रवचनकार गौर गोपालदास, सरिता कौशिक, निलेश खरे, मृणालिनी नानीवडेकर तसेच संघाचे उपाध्यक्ष विवेक इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारिता क्षेत्रातील योगदान, सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभाग याची दखल घेत संजय मराठे यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियुक्तीनंतर त्यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्क आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संजय मराठे यांच्या नियुक्तीमुळे पुणे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघाचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
![]()
