भावपूर्ण वातावरणात कानबाई मातेला निरोप
‘भव्य खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ उत्साहात संपन्न!
हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड: “खानदेशातील माता कानबाई उत्सवाच्या माध्यमातून आपली परंपरा आणि आपला इतिहास आई-वडील आपल्या मुलांना देत असतात. हा वारसा आणि आपला इतिहास पुढील पिढीला देणे अत्यंत आवश्यक असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो अतिशय सुंदररीत्या दिला जात आहे.” संस्कृती आणि परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती असल्याचे गौरोद्वार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या खान्देशची संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सणाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडितपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित तिसऱ्या ‘भव्य खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात, चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता आज अत्यंत भावपूर्ण वातावरणात माता कानबाईला निरोप देत उत्साहात व भावूक वातावरणात संपन्न झाली. या महोत्सवाच्या प्रास्ताविकात संयोजन समितीचे प्रमुख नामदेव ढाके यांनी उपस्थितांचे स्वागत करून महोत्सवाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
या सोहळ्यात आपले विचार मांडताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, “खानदेशातून येऊन शहरी भागात आपली संस्कृती जपणे अत्यंत अभिमानाची बाब आहे. माता कानबाई ही खानदेशातील कुलस्वामिनी असून, तिचा जागर करून शहरी भागातील पुढील पिढीपर्यंत तिची महती पोहोचवणे कौतुकास्पद आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात खान्देशी लोकांचा मोठा हातभार असून, एवढ्या दूर राहूनही आपल्या मातीची परंपरा येथील बांधवांनी कायम राखल्याचा विशेष आनंद आहे.”
आमदार शंकर जगताप यांनी कार्यक्रमाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, आपल्या मराठी भाषेला अभिजात मातृभाषेचा दर्जा मिळाला असून अहिराणी भाषेलाही तो मिळाला आहे. त्यामुळे ही मायबोली आपण आपल्या मुलांना शिकवली पाहिजे आणि तिचे जतन केले पाहिजे.
*मंत्र्यांचा अहिराणी गीतांवर ठेका!
महोत्सवादरम्यान पार पडलेल्या सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रमात खानदेश मातेच्या भक्तिगीत व पारंपरिक अहिराणी गाण्यांनी उपस्थितांसह सर्वांचेच मन जिंकले. या जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी देखील उत्स्फूर्तपणे अहिराणी गीतांवर ठेका धरत उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. या क्षणाने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली होती.
*कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती…
महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक राहुल कलाटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर, धर्मापाल तंतरपाळे, रिटा सानप, सचिन सानप, मा. उपमहापौर सचिन चिंचवडे, रेश्मा कातळे, बापू कातळे, शेखर चिंचवडे, आशाताई सूर्यवंशी, विकास साने, निलेश तरस मानचे सरपंच सचिन आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
*भावपूर्ण वातावरणात कानबाई मातेला निरोप; तीन दिवसीय कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता
खानदेशवासीयांच्या संस्कृती, परंपरा आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाच्या सांगता प्रसंगी माता कानबाईला निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शिरपूरच्या ‘गोल्डेन बँड’च्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ८ वाजता शुभम गार्डन ते जाधव घाट, रावेत या मार्गावर कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, महिलांचे पारंपरिक फुगडी व गरबा खेळणे आणि “कानबाई माता की जय” च्या जयघोषाने संपूर्ण रावेत परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जन घाटावर विधिवत पूजा व उत्तरपूजा करून माता कानबाईला अत्यंत जड अंतःकरणाने आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
या तीन दिवसीय महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘सप्ताह पूजन’ (गहू दळणे) या धार्मिक कार्यक्रमापासून श्रीगणेशा झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी येथून शुभम गार्डन, वाल्हेकरवाडीपर्यंत काढण्यात आलेल्या आगमन मिरवणुकीने आणि रात्री झालेल्या लोकप्रिय गायकांच्या संगीतमय कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली होती. या सोहळ्यात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या संस्कृतीचे जतन करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले.
*उत्सव यशस्वी आयोजनासाठी सर्व समाज बांधवांचा सहभाग
खान्देश मराठा मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, गुजर स्नेह वर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, खानदेश तिळवण तेली समाज मंडळ, लेवा पाटीदार समाज मंडळ, खानदेश माळी महासंघ, संतसेना महाराज खान्देश नाभिक मंडळ, भारतीय बहुजन विकास समिती, कानबाई सेवा फाउंडेशन (खानदेश) यांसह विविध समाज संघटनांच्या आणि हजारो समाजबांधवांच्या सक्रिय सहभागामुळे हा ऐतिहासिक सोहळा अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला. खानदेश परिवारातील एकोपा आणि आपुलकीचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पुढील वर्षी पुन्हा नव्या उत्साहात भरवण्याचा संकल्प करत या वर्षीच्या उत्सवाची सांगता करण्यात आली.


