शहराच्या विकासाला अधिक गती देण्याची अपेक्षा; भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा
हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंतापदी मनोज सेठिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज झालेल्या महापालिका सभेत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या आजवरच्या प्रशासकीय व अभियांत्रिकी सेवेचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर असून वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, विकासकामांची गुणवत्ता कायम राखणे तसेच विविध प्रकल्पांना नियोजनबद्ध पद्धतीने गती देण्यामध्ये शहर अभियंता पदाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मनोज सेठिया यांच्या अनुभवाचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल आणि त्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे, प्रलंबित विकासकामांना गती देणे आणि नागरिकांना अधिक उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सकारात्मक योगदान मिळेल, अशी अपेक्षाही पदाधिकारी व नगरसदस्यांनी व्यक्त केली. तसेच शहर अभियंता म्हणून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी आणि भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आर.पी. आय. गटनेते कुणाल वाव्हळकर, नगरसचिव अण्णा बोदडे यांच्यासह पदाधिकारी, नगरसदस्य आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.


