हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व कल्पकघर (आयसर पुणे व टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी विज्ञान, अंतराळ व तंत्रज्ञानाशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थी तसेच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि. २२ ऑगस्ट रोजी अनुप्रीता मोरे, संशोधन प्राध्यापक, आयुका यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने अंतराळ विज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय उपक्रमांमध्ये अंतराळ विषयावरील चित्रपट प्रदर्शन, खुली अंतराळ प्रश्नमंजुषा, मूलभूत खगोलशास्त्रावरील तारांगण डोम शो, चित्रकला स्पर्धा, विविध अंतराळविषयक कृती तसेच चंद्रयानाचे प्रतिकृती मॉडेल तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रोनची ओळख व त्याचे उड्डाण याविषयी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. कल्पकघरच्या माध्यमातून आभासी वास्तव तंत्रज्ञानावर आधारित ‘व्हीआर मून वॉक’ हा विशेष उपक्रम तसेच प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान समजून घेता यावे, यासाठी विविध विज्ञानविषयक उपक्रम घेण्यात आले.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, खगोलशास्त्र, ड्रोन तंत्रज्ञान आणि विज्ञानातील विविध संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जिज्ञासा आणि चिकित्सक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच अंतराळ विज्ञानाची आवड वाढावी, यासाठी पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक श्री. प्रवीण तुपे यांनी विद्यार्थी व प्रेक्षकांना प्रोत्साहित केले. अशा प्रकारचे उपक्रम सायन्स पार्क मध्ये वेळोवेळी होत असून विद्यार्थी व प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे आयोजित या विविध उपक्रमांमुळे राष्ट्रीय अंतराळ दिन विद्यार्थ्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी उत्साहपूर्ण, आनंददायी तसेच ज्ञानवर्धक ठरला.


