प्रकृती परमात्म्याचा अमूल्य उपहार – तिचे संरक्षण आपली जबाबदारी
पिंपरी,(हिंदवी न्यूज)- संत निरंका. मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने ५ जून रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत ‘जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्रातील खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा आणि सोमेश्वर यांसह देशभरातील १८ प्रमुख पर्वतीय व पर्यटनस्थळांवर सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन प्रेरणा आणि दिव्य आशीर्वादाने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान पार पडले
लोणावळा आणि खंडाळा येथे सकाळी ९ वाजल्यापासून निरंकारी मिशनतर्फे लोणावळा नगरपरिषदेच्या सहकार्याने भव्य वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. लोणावळा–खंडाळा परिसरातील खंडाळा ते अमृतांजन पॉईंट, वलवन तळे, कावेरी फार्म, नागरगाव, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा धरण गेट, आय.एन.एस. ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय तसेच मावळा पुतळा या ठिकाणांचा या अभियानात समावेश होता.
या कार्यक्रमाला लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि संत निरंकारी मिशनचे पदाधिकारी उपस्थित होते संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘Beat Plastic Pollution’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनापुरता मर्यादित नसून “सेवा, सुमिरण आणि सद्भाव” या तत्त्वांद्वारे निसर्गसंरक्षणाची एक आध्यात्मिक साधना म्हणून साकारला जात आहे. या अभियानात मिशनचे स्वयंसेवक, सेवादल सदस्य, श्रद्धाळू आणि स्थानिक नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पथनाट्ये आणि विविध जनजागृती उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. पर्यावरणविषयक संदेश असलेले फलक, मानवी साखळी आणि जनसंपर्क उपक्रमांद्वारे “निसर्गाची सेवा हीच प्रभूसेवा” हा संदेश जनमानसात रुजविण्यात आला.
संत निरंकारी मिशनचे पुणे झोनल प्रभारी अशोक अहुजा यांनी माहिती देताना सांगितले की, संत निरंकारी मिशन २०१४ पासून संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार ‘जागतिक पर्यावरण दिन’ सेवा, जनजागृती आणि लोककल्याणाच्या माध्यमातून सातत्याने साजरा करीत आहे.
आज जेव्हा संपूर्ण जग पर्यावरण संरक्षणासाठी जागरूक होऊन सकारात्मक पावले उचलत आहे, अशा वेळी संत निरंकारी मिशन आपल्या सेवा मूल्यांच्या माध्यमातून समाजात, विशेषतः युवा पिढीमध्ये हा संदेश अधिक दृढ करत आहे की स्वच्छता केवळ बाह्य वातावरणाची नसून विचारांची, संस्कारांची आणि जीवनशैलीचीही असली पाहिजे. “निसर्गाची सेवा हीच प्रभूसेवा” या भावनेतून राबविण्यात येणारे हे अभियान स्वच्छ, सुरक्षित आणि हरित भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान ठरत आहे.
![]()
