हिंदवी न्यूज | पिंपरी
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदाही पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गेल्या सहा वर्षांपासून “पिंपरी चिंचवडकर साहित्यिकांची दिंडी” आध्यात्मिक विचारांचा प्रसार करत पालखी सोहळ्यात सहभागी होत असून, यंदा “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” या संतवचनातून “झाडे लावा, झाडे जगवा” हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा जागर हाती संदेशफलक घेऊन करण्यात आला. शहरातील साहित्यिकांनी अभंग, गवळणी आणि हरिनामाचा गजर करत तसेच पारंपरिक वेशभूषेत, हाती टाळ घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेतील ह.भ.प. प्रकाश घोरपडे यांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. फेर धरून, फुगड्या खेळत आणि रामकृष्णहरी नामाचा गजर करत साहित्यिकांनी भक्तिमय वातावरणात दिंडीचा आनंद लुटला.
दिंडीच्या विसाव्याच्या ठिकाणी हेमंत जोशी, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सुभाष चटणे, संजय गमे, शामराव सरकाळे, सुरेश कंक, मल्लिकार्जुन इंगळे, सुरेंद्र विसपुते यांनी भावपूर्ण अभंग, गवळणी आणि कविता सादर केल्या. या आध्यात्मिक कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन सुहास घुमरे यांनी केले.
दिंडीचे संयोजन ह.भ.प. अशोक महाराज गोरे, मुरलीधर दळवी, दत्ता कांगळे, शिवाजीराव शिर्के, शरद काणेकर, संपत शिंदे, हनुमंत भोसले, सुभाष चव्हाण, मुकुंद जोशी, बाळासाहेब कुंभार, अभय जोशी आणि अनंत पाठक यांनी केले. आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिराजवळ दिंडीची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
![]()
