पिंपरी, (हिंदवी न्यूज )– जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस जनजागृती दिन” निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (एमएसएसआय), पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उप आयुक्त ममता शिंदे व दिव्यांग भवनच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाद्वारे मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मार्गदर्शन व आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिनाचे महत्त्व आणि या आजाराविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याची गरज याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सुविधा व सेवांविषयी पूजा भापकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच मोहना परांजपे, ज्योती रोंघे आणि व्ही. व्ही. रमणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते न्युरोलॉजिस्ट डॉ. परेश बाबेल यांनी मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मल्टिपल स्क्लेरोसिस हा मेंदू आणि मज्जारज्जूवर परिणाम करणारा दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवरील मायेलिन या संरक्षक आवरणावर हल्ला करते. त्यामुळे मेंदू आणि शरीरातील संदेशवहनात अडथळे निर्माण होतात. दृष्टीदोष, हात-पायात मुंग्या येणे, अशक्तपणा, तोल जाणे, थकवा आणि स्नायूंमध्ये ताठरपणा ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण, जनजागृती आणि समाजातील सर्व घटकांचा सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले. दिव्यांगत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
सामान्य नागरिकांना मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी एमएसएसआय, पुणे विभागाशी संलग्नित रोषे कंपनीच्या सहकार्याने विशेष ‘अनुभव क्षेत्र’ उभारण्यात आले होते. या उपक्रमात उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी एगलन्स मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे निशाद बागवडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सचिन तुरुकमारे यांना इलेक्ट्रिक बाईक भेट दिली. तसेच मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी आपले अनुभव कथन करत सकारात्मक दृष्टिकोनातून या आजारावर मात करून जीवन अधिक सुकर कसे केले, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक नंदकुमार फुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय समुपदेशक तथा कार्यक्रम व्यवस्थापक दर्शना फडतरे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यांग समन्वयक तुकाराम शेवाळे यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे इतिवृत्त समुपदेशक तथा कार्यक्रम व्यवस्थापक सुनीता गावित यांनी सादर केले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पालक, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
