दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले नगरसेविका सुजाता बोराटे आणि युवा नेते निलेश बोराटे !
हिंदवी न्यूज | पिंपरी
आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवाभावी उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातील गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी विधी समिती सभापती तथा नगरसेविका सुजाता बोराटे आणि युवा नेते निलेश बोराटे यांनी पुढाकार घेतला आहे.
खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील तब्बल ४५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील भोरगिरी, पाभे, भोबळे आणि विव्हे या गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळेनागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन या गावांतील गरजू कुटुंबांची निवड करून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. ही मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचावी, यासाठी सुजाता बोराटे, निलेश बोराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष नियोजन केले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून त्यांना रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मदतकार्यातून करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना केवळ आपल्या प्रभागातील विकासकामांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण व दुष्काळग्रस्त भागातील बांधवांच्या मदतीसाठी पुढे येण्याची संवेदनशील भूमिका नगरसेविका सुजाता बोराटे यांनी घेतली आहे. या सेवाभावी उपक्रमात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजातील शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करणे आणि संकटाच्या काळात त्यांना आधार देणे हेच आमचे कर्तव्य असल्याची भावना यावेळी सुजाता बोराटे आणि निलेश बोराटे यांनी व्यक्त केली.









