‘इनोव्हेशन महाकुंभ २०२६’चा समारोप; माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून विद्यार्थिनींच्या नवोपक्रमांचे कौतुक
हिंदवी न्यूज | मुंबई
समाजातील प्रत्यक्ष समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधणाऱ्या विद्यार्थिनींच्या संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२६’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचा सोमवारी उत्साहात समारोप झाला. समारोपप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थिनींनी विकसित केलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची पाहणी केली आणि विद्यापीठाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
५ आणि ६ जुलैदरम्यान आयोजित या प्रदर्शनात आरोग्य, पर्यावरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, वस्त्रोद्योग, जलसंवर्धन आणि सामाजिक समस्यांवर आधारित अनेक नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. उद्योग, संशोधन आणि समाज यांना जोडणारे हे प्रदर्शन उपस्थितांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. प्रदर्शनातील OURO या प्रकल्पाद्वारे वस्त्रोद्योगातील उरलेल्या कापडापासून पुनर्वापरयोग्य वस्त्रनिर्मितीची संकल्पना मांडण्यात आली. EndoLISA या प्रकल्पातून महिलांमधील एंडोमेट्रिओसिस आजाराच्या प्रभावी औषध व्यवस्थापनासाठी संशोधन करण्यात आले आहे. Smart ADAS या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीद्वारे कमी खर्चात जुन्या वाहनांमध्ये चालक सहाय्यक तंत्रज्ञान बसविण्याची संकल्पना सादर करण्यात आली. SwarSetu या संशोधनातून एएलएस किंवा स्ट्रोकमुळे बोलण्याची क्षमता गमावलेल्या रुग्णांसाठी संवादाचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. तर Aquatic Explore या प्रकल्पाद्वारे नद्या व तलावांतील पाण्याच्या गुणवत्तेचे आधुनिक सेन्सर्सच्या साहाय्याने परीक्षण करण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले, “एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनींनी केवळ शैक्षणिक संशोधन न करता समाज आणि उद्योगांसमोरील प्रत्यक्ष प्रश्नांवर परिणामकारक व परवडणारे उपाय शोधले आहेत. महिला संशोधक आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा विद्यापीठाचा हा उपक्रम देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरेल.”
समारोप समारंभाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पुणे कॅम्पस प्रमुख डॉ. शीतल मोरे, डॉ. भरत व्हनकटे, डॉ. महेश कोलतामे, डॉ. वीरेंद्र नगराळे, डॉ. गणेश चव्हाण यांच्यासह प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन डॉ. गणेश चव्हाण यांनी केले.
महिला संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देणाऱ्या या प्रदर्शनामुळे एसएनडीटी महिला विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
![]()
