मोशी कचरा डेपो दुर्घटनेची एसआयटी चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी
हिंदवी न्यूज | पिंपरी
मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी संपूर्ण घटनेची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम यांनी केली आहे.
प्रविण कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ८ तारखेला दुपारी एकच्या सुमारास कचऱ्याचा ढिगारा कोसळून दुर्घटना घडली असताना बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले नाही. त्याआधी दोन दिवस कचरा कोसळत असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
दुर्घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी बचाव यंत्रणा वाढविण्यात आली. काँक्रीटचा भाग फोडण्यासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक डिमोलिशन एक्स्कॅव्हेटर मशीन घटनास्थळी उशिराने पोहोचले. तसेच कचऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी लेब्राडॉर तंत्रज्ञानाचा वापर का करण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दुर्घटनेदरम्यान कचऱ्यातील मिथेन वायू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एनडीआरएफच्या जवानांना श्वास घेण्यास अडचणी येत असताना त्यांच्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याबाबतही त्यांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. ९ तारखेला पोकलेन, डंपर, एनडीआरएफचे अतिरिक्त पथक आणि अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास विलंब का झाला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कचरा डेपोची क्षमता संपलेली असतानाही तेथे कचऱ्याचे ढीग वाढवत नेण्यात आले. शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून कामगारांच्या जीवाशी खेळण्याचे काम सत्ताधारी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुर्घटनेच्या काळात काही लोकप्रतिनिधी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते, तर महापालिका आयुक्त दिंडी कार्यक्रमात सहभागी होते. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आवश्यक ती संवेदनशीलता दाखवली नसल्याची टीकाही त्यांhनी केली.
कचरा डेपो परिसरातील महापालिकेच्या इमारतीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. एका मजल्याची परवानगी असताना तीन मजली इमारत कशी उभारण्यात आली, तसेच कचऱ्याचा डोंगर आणि कार्यालयीन इमारतीदरम्यान अवघ्या एका वाहनालाच जाता येईल इतका अरुंद रस्ता कसा तयार झाला, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
कचरा डेपोच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच या प्रकरणात कोणालाही राजकीय संरक्षण दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार असेल, असा इशाराही प्रविण कदम यांनी दिला.
![]()
