हिंदवी न्यूज | पिंपरी
आषाढी वारी पालखी सोहळानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीतून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर येथे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने भव्य वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्त्या शायना एनसी व श्रीमती श्रेया योगेश कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकरी बंधू-भगिनींचे पुष्पवृष्टी, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या अखंड गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी शायना एनसी आणि श्रेया कदम यांनी वारकऱ्यांसमवेत पायी चालत दिंड्यांमध्ये सहभाग नोंदविला. त्यांनी वारकरी बंधू-भगिनींमध्ये मिसळून त्यांच्या वारीतील अनुभव, प्रवासातील अडचणी, उपलब्ध सुविधा तसेच आवश्यक गरजा जाणून घेत संवाद साधला. विशेषतः महिला वारकरी भगिनींशी संवाद साधत त्यांच्या सुरक्षिततेपासून आरोग्य आणि मूलभूत सुविधांपर्यंत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान शायना एनसी व श्रेया कदम यांनी वारकरी महिला भगिनींसमवेत रिंगण व फुगडीमध्ये सहभागी होऊन वारीच्या परंपरेचा आनंद अनुभवला. अनेक वारकरी भगिनींनी त्यांच्यासोबत संवाद साधत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करत शायना एनसी म्हणाल्या, “आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, समतेचा आणि मानवतेचा जिवंत उत्सव आहे. हजारो वारकऱ्यांसोबत पायी चालत संवाद साधताना त्यांच्या श्रद्धेची, संयमाची आणि सेवाभावाची प्रचिती येते. वारकऱ्यांच्या सहवासात मिळणारी ऊर्जा आणि अध्यात्मिक समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. विठ्ठलभक्तांची सेवा करणे हे आमच्यासाठी सन्मानाचे आणि भाग्याचे कार्य आहे. समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सेवाभाव अधिक दृढ व्हावा, हा वारीचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे.”
श्रेया कदम यांनी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायासाठी शासनाच्या माध्यमातून विविध सेवाभावी आणि लोककल्याणकारी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्य सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता, वैद्यकीय मदत आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. महिला वारकरी भगिनींशी संवादातून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्याची संधी मिळाली असून अशा सेवाभिमुख उपक्रमांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.” या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमा दरम्यान विविध दिंड्यांमधून आलेल्या वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
![]()
