हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या मासिक विज्ञान व्याख्यानमालेतील १३९वे विज्ञान व्याख्यान शनिवारी (दि. १ ऑगस्ट २०२६) उत्साहात पार पडले. सायन्स पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमात दीपक जोशी (ज्योतिर्विद्या परिसंस्था, पुणे) यांनी ‘धूमकेतू कसे शोधावे?’ या विषयावर मार्गदर्शन करत धूमकेतूंचा शोध, त्यामागील वैज्ञानिक प्रक्रिया आणि खगोलशास्त्रातील विविध पैलूंवर उपस्थितांना रंजक माहिती दिली.
कार्यक्रमासाठी मराठी विज्ञान परिषदेचे विनय र. र. हे उपस्थित होते. त्यांनी व्याख्यात्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. दीपक जोशी यांनी प्रेक्षकांना स्लाईड शोच्या माध्यमातून अवकाश निरीक्षणाविषयी उद्बोधक माहिती दिली. विविध धुमकेतूच्या रचना व त्यांच्या अवकाशातील भ्रमणाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण माहिती प्रेक्षकांना देण्यात आली. सायं. ७ः०० वाजता पिंपरी चिंचवड सायन्स पार्क च्या वतीने *संगीत संध्या* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीत संध्या कार्यक्रमामध्ये शेखर कुंभोजकर यांच्या मधुर गायनाने अभंग वाणी कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी सुरुवातीला शास्त्रीय गायन सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. दत्तात्रय भावे व राजीव तांबे यांनी साथसंगत केली. पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे , सारंग ओक इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.


