हिंदवी न्यूज | पिंपरी
अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प १०वे’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. पारंपारिक नृत्य, कथक नृत्य, स्वरचित कविता, कराओके गाणी, स्वगत, पारंपारिक क्लारनेट वाद्य, भजन, चित्र प्रदर्शन अशा विविध कलाप्रकारांच्या बहारदार सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
ज्येष्ठ साहित्यिक राज आहेरराव यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले की, शहरातील सुप्त कलागुणांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या प्रतिभेला रसिकांसमोर आणून नावलौकिक मिळवून देणे हे भाऊसाहेब भोईर यांचे स्वप्न असून त्यांच्यासाठी निःस्वार्थ भावनेने सर्व सहकारी काम करत आहेत. कलाकार कट्टा या उपक्रमात सहभागी होणाऱ्या कलावतांचे लवकरच भव्य कला संमेलन घेतले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या प्रसंगी बालरंगभूमी परिषद पिंपरी चिंचवड शाखेकडून घेतलेल्या इतिहास महाराष्ट्राचा 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावरील राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट समूह नाटिका म्हणून नावाजलेल्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सुभाष चव्हाण यांच्या शंख वादनाने झाली. कलाक्षेत्रम ग्रुपच्या अनाया ,अधिरा,आराध्या, अनाया यांनी बहारदार नृत्य सादर केले, नृत्यांगना ऋतुजा देहूगावकर हिने सादर केलेल्या कथ्थक नृत्याने रसिकांची मने जिंकली. नेहा कुलकर्णी यांनी स्वरचित कविता सादर केली,
वंदना मातेरे आणि सुनीता साळुंके यांनी कराओके गायन सादर केले. ईश्वर साठे या बालकलाकार यानी क्लारनेट वाद्य वाजवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कु. वैष्णवी कांबळे या विद्यार्थिनीने स्वगत सादर केले. आरती कोरडे आणि छाया गायकवाड या दोन चित्रकारांची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली त्यालाही रसिकांची दाद मिळाली. श्रीराम भजनी मंडळाच्या भजनाने समारोप करण्यात आला. कलाकार कट्याचे संयोजन संतोष रासने, हरीश मोरे, अशोक होनराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी तर आभार प्रदर्शन आसाराम कसबे यांनी केले.



