माहिती अधिकार अधिकाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता जनजागृती उपक्रम राबवण्याची काळे यांची मागणी.
हिंदवी न्यूज | पिंपरी
माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने माहिती अधिकार दिनानिमित्त नागरिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत सतीश काळे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे निर्देश आहेत. या दिवशी प्रश्नमंजुषा,चर्चासत्र, व्याख्यान तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबवून नागरिकांना माहिती अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
मात्र महापालिका प्रशासनाकडून माहिती अधिकार दिनाचा उपक्रम केवळ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी माहिती अधिकार प्रशिक्षणापुरता मर्यादित राहू नये, अशी भूमिका काळे यांनी मांडली आहे. माहितीचा अधिकार हा सामान्य नागरिकांच्या हक्काशी संबंधित असल्याने त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
महापालिकेने शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून माहिती अधिकार दिन साजरा करावा. यावेळी माहिती अधिकार कायद्याची प्रक्रिया, अर्ज कसा करावा, नागरिकांचे अधिकार आणि प्रशासनाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
“माहितीचा अधिकार हा केवळ कागदावरील कायदा न राहता तो सर्वसामान्य नागरिकांना सहज वापरता यावा, यासाठी महापालिकेने व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे,” असे सतीश काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे कार्याध्यक्ष विशाल मिठे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




