हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील या थोर महापुरूषांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजांविरुद्धच्या भारत छोडो अभियानामुळे तसेच असहकार आंदोलनामुळे देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांचे, देशभक्तांचे आदर्श व प्रेरणास्त्रोत बनले. ते नेहमी सत्य,अहिंसा आणि स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही असायचे. संपूर्ण देशवासीयांचे बळ सैन्यदलाच्या पाठीशी उभे करणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री हे थोर स्वातंत्र्य सैनिक, मुत्सद्दी राजकारणी तसेच प्रखर देशभक्त होते.




