हिंदवी न्यूज | आळंदी
आळंदी नगरपरिषदेच्या हनुमानवाडी येथील कचरा डेपोला सातत्याने आग लागत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासंदर्भात वेळीच उपाययोजना करावी, अन्यथा पोलिस तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हा भारतीय जनसंसद अध्यक्ष पैलवान बाळासाहेब चौधरी यांनी दिला आहे.
कचरा डेपोमधून निघणाऱ्या धुरामुळे केळगावच्या हनुमानवाडी परिसरातील रहिवासी तसेच शेजारील ठाकरवाडीतील आदिवासी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कचरा डेपोला कंपाऊंड नसल्यामुळे जनावरे कचरा खात असून अनेक जनावरे आजारी पडून मृत्यूमुखी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पैलवान बाळासाहेब चौधरी यांनी केला आहे.
याबाबत तहसीलदार प्रशांत बेडसे आणि उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्याकडे नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. कचरा डेपो परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, कचरा जाळण्याच्या प्रकारावर नियंत्रण आणावे आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.आळंदीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कधी थांबणार? प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत.









