सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणाच्या दिशेने महापालिकेची पावले
हिंदवी न्यूज | पिंपरी
हरातील सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृह अधिक स्वच्छ, सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या धोरणात नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष अनुभवांचा समावेश करण्यासाठी निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींसोबत केंद्रित गटचर्चा आयोजित करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छता गृहांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यामध्ये नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षांचा समावेश करण्यावर भर देण्यात येत आहे. गटचर्चेत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, निवासी कल्याण संघटनांचे (आरडब्ल्यूए) प्रतिनिधी, तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, सुविधा, देखभाल, सुरक्षितता आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या.
दिव्यांगांसाठी सुलभ आणि आधुनिक सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरण्यास सोयीस्कर रचना, तृतीयपंथी नागरिकांसाठी सन्मानपूर्वक सुविधा, नियमित स्वच्छता, अखंड पाणीपुरवठा, पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षित वातावरण, वेळेवर दुरुस्ती आणि प्रभावी देखभाल या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठीही विविध सूचना नोंदविण्यात आल्या. यावेळी उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, “आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी नागरिक आणि निवासी संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना या धोरणाला अधिक सर्वसमावेशक आणि नागरिकाभिमुख बनविण्यास उपयुक्त ठरतील.”
गटचर्चेत प्राप्त झालेल्या सूचना आणि शिफारशींचा सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणाच्या अंतिम मसुद्यात समावेश करण्यात येणार असून, त्याद्वारे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह सेवा अधिक दर्जेदार, सुलभ आणि परिणामकारक करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या चर्चा सत्रात उप आयुक्त अतुल पाटील, सहा. आयुक्त दशरथ कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, सुधीर वाघमारे, महेश आढाव, शांताराम माने, राजेश भाट, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, उप अभियंता वंदना मोरे, अभिजित गनबोटे, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तन्मय गौंड यांनी केले तर उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी उपस्थितांचे आभार मानले. नागरिकांच्या सहभागातून तयार होणारे हे धोरण सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्थापन अधिक सक्षम, शाश्वत आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.


