“प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर हो… आम्ही गुन्हेगार!”
पिंपरी,(हिंदवी न्यूज)- पत्रकारांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले. संबंधित खासदार संजय दिना पाटील यांनी माफी मागून प्रकरण संपणार नसून, त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
चिंचवड येथील के.एस.बी. चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनाची सुरुवात शाहू महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांनी घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदविला. आंदोलनावेळी “प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर हो… आम्ही गुन्हेगार!” अशा आशयाचे फलक दाखवत तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. यापुढे पत्रकारांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, पुणे जिल्हाध्यक्ष संजय मराठे तसेच विकास साळवे आणि संगीता पाचंगे यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारितेवरील दबाव हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला असल्याचे सांगितले. पत्रकार प्रश्न विचारण्याचे कर्तव्य बजावत राहतील आणि संबंधित खासदारा विरोधात पक्षाने कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील पत्रकार सहभागी झाले होते. विवेक कुलकर्णी, बजरंग मासाळ, संतोष महामुनी, रोहित खर्गे, नागेश खजुर्गीकर, पराग डिंगणकर, उमेश सणस, तौफीक सय्यद, गजाला सय्यद, आसीया इनामदार, उमेश पाटील, जगदीश बच्छाव यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.
आंदोलनाच्या समारोपावेळी संबंधित खासदाराविरोधात पक्षाने कठोर कारवाई केली नाही, तर राज्यभर शिवसेना पक्ष आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या वृत्तांकनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केले.
![]()
