हिंदवी न्यूज | देहू
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गटाच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त देहू ते आकुर्डी कामगार प्रबोधन दिंडी उत्साहात पार पडली. विविध आस्थापनांतील कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच सेवानिवृत्त कामगारांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी साकारलेली भगवान विठ्ठलाची वेशभूषा, व ह.भ.प. शामराव गायकवाड महाराज यांनी साकारलेली संत तुकाराम महाराजांची वेशभूषा. यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले, “आम्हा दोघांना साक्षात पांडुरंग आणि संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत पाहून अनेक भाविक ‘माऊली’ म्हणत दर्शन घेत होते. आम्हालाही वारकरी भक्तांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. आमच्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना आहे.” गेल्या दोन वर्षांपासून विठ्ठलाच्या वेशभूषेत एकदिवसीय वारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण उपायुक्त मनोज पाटील म्हणाले की, तत्कालीन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मंडळाच्या वतीने कामगार प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय प्रबोधन दिंडीत अनेक आस्थापनांनी आणि कामगारांनी सहभाग नोंदविला असून, कामगारांसोबत साहित्यिकही फुगडी, भजन आणि वारकरी परंपरेत सहभागी होत असल्याचे कल्याण आयुक्त भास्करराव मोरडे यांनी सांगितले.
यावेळी ह.भ.प. शामराव गायकवाड महाराज यांचे प्रवचन झाले.
महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त भास्करराव मोरडे, पुणे जिल्हा विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज पाटील आणि अधीक्षक संजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या कामगार प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीला कामगार आणि वारकरी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी कल्याण आयुक्त भास्करराव मोरडे, कल्याण उपायुक्त मनोज पाटील, विठ्ठलाच्या भूमिकेत गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, अधीक्षक संजय थोरात, उपाध्यक्ष सुधाकर पाटील, कल्याण निरीक्षक संदीप गावडे, गुणवंत कामगार ह.भ.प. शामराव गायकवाड, केंद्र संचालक प्रदीप बोरसे, चाकणचे केंद्र संचालक अविनाश राऊत, संदीप गावडे, अनिल कारळे, सुनील बोराडे, सुरेश पवार, सामाजिक कार्यकर्ते निलेश हंचाटे, लक्ष्मण इंगोले, शंकर नाणेकर, राजेश हजारे, यादव तळवले, शिवराज शिंदे, सुहास माने, सुदाम शिंदे, सुरेखा मोरे, उज्वला अवघडे, संगीता क्षीरसागर, रूपाली मुळीक तसेच विविध आस्थापनांचे कामगार प्रतिनिधी आणि कामगार उपस्थित होते.
प्रीमियम ट्रान्समिशन प्रीमियम आणि मित्रपरिवार यांच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जाधववाडी- भोसरीचे भजनी मंडळ यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
![]()
