हिंदवी न्यूज | पिंपरी
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आळंदी ते बोपखेल पर्यंतच्या पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि राजपिता रमित जी यांच्या प्रेरणेने आणि “स्वच्छता ही सेवा” या मानवकल्याणाच्या संदेशाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात मिशनचे शेकडो सेवादल , स्वयंसेवक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. पालखी मार्गावरील रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, बसथांबे तसेच परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली. भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व आनंददायी वातावरण उपलब्ध व्हावे, तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने केलेल्या सेवाकार्याचे कौतुक केले. आध्यात्मिकते सोबत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून अशा उपक्रमांमुळे समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. संत निरंकारी मिशनचे पुणे झोनचे झोनल इन्चार्ज अशोक अहुजा यांनी सांगितले की, सेवा, प्रेम, सहअस्तित्व आणि मानवतेचा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचविणे हे मिशनचे ध्येय असून, रक्तदान, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन आणि स्वच्छता अभियान यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम देशभर सातत्याने राबविले जात आहेत. या स्वच्छता अभियानाद्वारे संत निरंकारी मिशनने पुन्हा एकदा अध्यात्मासोबत सामाजिक बांधिलकी जपत “सेवा हीच खरी उपासना” हा संदेश दिला
![]()
