हिंदवी न्यूज | पिंपरी
बाबा हरदेव सिंह जी यांच्या “प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहेत” या संदेशातून प्रेरणा घेत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या आशीर्वादाने ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या अभियानाला देशभरात जनचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वृक्षारोपणासोबतच निसर्गाशी आत्मीय नाते दृढ करणे आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी समाजात रुजविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ३५० वृक्ष समूह विकसित करण्यात आले असून, ६०० हून अधिक ‘वननेस वन’ स्थळांवर श्रद्धाळू व सेवादलाचे स्वयंसेवक वृक्षांची देखभाल करीत आहेत.
या अभियानाच्या सहाव्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, २३ ऑगस्ट रोजी देशभरातील ६३० ठिकाणी एकाच वेळी करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे १० लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात भवरापूर, कोरेगाव, खुटबाव, पाषाण-सुतारवाडी, देहूगाव आणि पिंपळगाव खडकी येथे अभियान राबविण्यात येणार असून, सुमारे १० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यासोबतच मागील सहा वर्षांत लावलेल्या एक लाखांहून अधिक वृक्षांची देखभाल केली जाणार असल्याची माहिती पुणे झोनचे इन्चार्ज अशोक अहुजा यांनी दिली. मिशनच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीनंतर रोपांची तीन ते पाच वर्षे नियमित देखभाल करून त्यांचे वृक्षात रूपांतर करण्यावर भर दिला जातो.
हवामान बदल, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास या पार्श्वभूमीवर ‘वननेस वन’ अभियानातून पर्यावरण संवर्धनासोबतच सामूहिक जबाबदारी आणि निसर्गासोबत सहअस्तित्वाचा संदेश दिला जात आहे.


