हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात टुरिस्ट बसेसमुळे निमार्ण होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे टुरिस्ट बसेस वर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यन्त बंदी घालण्यात यावी व याबाबत आवश्यक उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी युवासेना उपशहरप्रमुख कुणाल जगनाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत महापौर व महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा येथे गेल्या काही काळात टुरिस्ट बसेसची संख्या मोट्या प्रमाणात वाढली आहे, विशेष म्हणजे ह्या टुरिस्ट बसेस कुठलाही कायदा नियम पाळत नसून त्या दिवसभर शहराच्या मुख्य रस्त्यावर, तसेच अंतर्गत रस्त्यावर देखील बेशिस्तपणे धावत आहेत, शहरातील बहुतांश प्रमुख चौक, बसथांबे, उड्डाणपूल तसेच रस्त्यांवर ही वाहने विना परवानगी व विनानियोजन थांबत आहेत, नाशिक फाटा, CIRT गेट, राजमाताजीजाऊ कमान, भोसरी उड्डाणपूल, गणेशसाम्राज, साने चौक, घरकुल चौक, भक्ति शक्ती चौक, प्राधीकरण, रावेत, बिर्ला हॉस्पिटल, डांगे चौक, भूमकर चौक, वाकड, दापोडी , सांगवी आदी ठिकाणी या बस राजरोसपणे प्रवासी चढविणे व उतरविण्यासाठी त्या वारंवार थांबत असतात ज्यामुळे वाहतुक पूर्णपणे विस्कळीत होते. यातील अनेक चालक निष्काळजीपणे वाहन चालवतात ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
वाहतूक कोंडीत आयटी फिल्डचे कामगार,एम,आई.डी.सी.चे कामगार, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशामक वाहने यांना मार्ग मिळण्यास अडथळा निर्माण होत असून यांना तासन तास वाहतुकीत अडकून पडावे लागते, वाहतूक पोलिसावरही याचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे . त्यामुळे मुख्य चौक, बस थांबे, उड्डाण पूल व मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे थांबणाऱ्या टुरिस्ट बसेसवर त्वरित दंडात्मक कारवाई करावी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नो-पार्किंग व बस थांबा क्षेत्र निश्चित करावे, वाहतूक पोलीस व पालिकेच्या सयुंक्त पथकाद्वारे विशेष मोहीम राबवावी आणि महत्वाचे म्हणजे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत शहरात ह्या बसेसना बंदी घालावी, अशी मागणी कुणाल जगनाडे यांनी केली आहे.


