Spread the love

नागरिकांना संयम बाळगण्याचे वन विभागाचे आवाहन

हिंदवी न्यूज | बेळगाव/पुणे 

खानापूर वन उपविभागातील विविध भागांत गेल्या आठवडाभरापासून फिरत असलेल्या हत्तींच्या कळपाला पुन्हा जंगलात परतविण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. या कळपात सुमारे नऊ हत्ती असून, बुधवारी रात्री भीमगड वन्यजीव क्षेत्रातील पाली गावाजवळील भाताच्या शेतात सात हत्ती आढळून आले. या कळपात एका नर हत्तीबरोबर दोन पिल्लेही असल्याने वन विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे.

खानापूरचे सहाय्यक वनसंरक्षक बसवराज वाळद आणि वनक्षेत्र अधिकारी सय्यदसाब नदाफ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत वन कर्मचाऱ्यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी पाली गावाजवळील भाताच्या शेतात हत्तींचा कळप असल्याची खात्री करण्यात आली. खानापूर उपविभागातील पाली, हेम्मडगा, अबनाळी, डोंगरगाव आणि शिरोळीवाडा परिसरात हत्तींची हालचाल दिसून आली आहे. हत्ती भाताच्या शेतांच्या कडेला फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्तींना जंगलाच्या दिशेने परतविण्यासाठी वन कर्मचारी विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, हत्ती पुन्हा भाताच्या शेतांकडे वळत असल्याने त्यांना जंगलात परतविणे वन अधिकाऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनेही हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पाली गावाजवळील जंगल रस्त्याच्या कडेला हत्तींचा कळप दिसल्याने काही दुचाकीस्वार घाबरून तेथून निघून गेले. वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत हत्तींचा कळप तेथून पुढे निघून गेला होता. बेळगाव वन विभागाच्या हद्दीत अलीकडे प्रथमच अशा प्रकारे हत्तींच्या कळपाची मोठ्या प्रमाणावर हालचाल दिसून आली आहे. हत्तींच्या हालचालींवर ड्रोनच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक ठिकाणी वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक बसवराज वाळद यांनी दिली.

हळियाळ, कॅसलरॉक, जळगापेट, तिनईघाट आणि गणेशगुडी या जंगल परिसरातून अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप खानापूर परिसरात आला असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. नर हत्तीसोबत पिल्ले असल्यामुळे हा कळप अधिक संवेदनशील आणि धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी वन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हत्तींच्या जवळ जाऊ नये. हत्ती दिसल्यास आरडा ओरड करू नये, फटाके फोडू नयेत किंवा हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

हत्तींच्या कळपाला सुरक्षितपणे पुन्हा जंगलात परतविण्यासाठी वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक एन. ई. क्रांती यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply