हिंदवी न्यूज | पिंपरी
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढल्याने महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या आवारात पाळीव श्वान आणून पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि लहान मुले व नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी दि.२० राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट)वतीने महापालिकेच्या आवारात कुत्रे आणून अनोखे आंदोलन करण्यात आले.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक यश साने, तुषार सहाणे व संगीता ताम्हाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
शहरासह चिखली परिसरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर केलेल्या गंभीर हल्ल्यांचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. या समस्येबाबत कार्यवाहीबाबत ढिम्म प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी कुत्रं आणून महापालिका भवनाच्या आवारात आक्रमक घोषणाबाजी केली.
चिखली व चिंचेचा मळा परिसरात लहान चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे नागरिक व नगरसेवक आक्रमक झाले होते. या घटनांमुळे महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्रं महापालिकेकडून यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. तसेच महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत त्वरित कारवाई करावी अन्यथा पुढील आंदोलनात शहरातील पिसळलेले व भटके कुत्रे थेट महापालिका कार्यालयात आणून सोडले जातील असा इशारा आंदोलकांनी दिला.


