आळंदी,(हिंदवीन्यूज) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढ वारी पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोड सेवा देण्यावरून सुरू असलेला वाद अखेर सामोपचाराने मिटला आहे. बैलजोड निवड समितीने तिन्ही अर्जदारांना सेवेची संधी देण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद संपुष्टात आला आहे. आता पालखी सोहळ्यात पुणे जिल्ह्यासाठी हर्षवर्धन रानवडे, सातारा जिल्ह्यासाठी उमेश रानवडे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी तुळशीराम रानवडे हे अनुक्रमे बैलजोड सेवा देणार आहेत. पालखी सोहळ्याची परंपरा आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन समितीने तिन्ही मानकरीना सेवा विभागून दिली आहे.
या वादावर तोडगा काढण्यासाठी आळंदी देवस्थानने पुढाकार घेतला याबाबत सात तास बैठक चालली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यातआले, मात्र शेवटी सर्वानुमते सुवर्णमध्य काढण्यात यश आले. या निर्णयाचे रानवडे परिवारातील तिन्ही मानकाऱ्यांनी स्वागत केले असून, याआधी झालेला पत्रव्यवहार आणि न्यायालयातील कायदेशीर लढा व देवस्थानला दिलेली नोटीस मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अखेर हा वाद मिटल्यामुळे कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
काय होता वाद?
सन १९८२ पासून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासाठी बैलजोड सेवा देण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थांकडून अर्ज मागवून रोटेशन पद्धतीने सेवा दिली जाते. यंदा रोटेशननुसार रानवडे कुटुंबाकडे ही सेवा येत होती. मात्र, कुटुंबात एकमत न झाल्याने उमेश रानवडे यांनी स्वतःला प्राधान्य देण्याची मागणी करत लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर समितीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, मात्र तो मान्य न झाल्याने न्यायालयात जाण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती. पुढे समितीने स्थळ पाहणी केली असता उमेश रानवडे यांच्याकडे बैलजोड व गोठा नसल्याचा अहवाल समोर आला. त्यानंतर समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल करून आवश्यक चौकशीची मागणी केली होती. समितीने सुरुवातीला स्वतः बैलजोड सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र अखेर तिन्ही अर्जदारांना जिल्हानिहाय सेवा देण्याचा निर्णय घेऊन कायमस्वरूपी हा वाद मिटविण्यात आला आहे.
समितीचा निर्णय व देवस्थानची अंतिम मान्यता
पहिल्यांदा समितीने स्वबळावर बैलजोडी देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अखेरचा निर्णय घेताना तिन्ही अर्जदारांच्या मागणीचा मान राखून सेवा विभागून देण्यात आली आहे. समितीच्या या निर्णयावर आळंदी देवस्थाननेही शिक्कामोर्तब केले असून देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी या निर्णयाला अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे आता पालखी सोहळ्यातील ही महत्त्वाची सेवा शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.
बैठकीला समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, समिती सदस्य नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रमेश कुऱ्हाडे, रामदास भोसले, शिवाजीराव रानवडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
![]()
