हिंदवी न्यूज | पुणे
येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीतील पुरुष वकील कक्षातून बॅगेत ठेवलेला ३६ हजार रुपये किंमतीचा आयपॅड चोरट्याने लांबविल्याची घटना मंगळवारी (दि. ६) घडली. याप्रकरणी ॲड. आर्यन खेडेकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या वकील कक्षातून वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने वकिलांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. कक्षाच्या आत आणि प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्यांची दर दोन महिन्यांनी तपासणी करावी तसेच रेकॉर्डिंग किमान तीस दिवस जतन करावे, अशी मागणी वकिलांनी पुणे बार असोसिएशनकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत ॲड. रवींद्र शिंदे म्हणाले, वकीलांचा कक्ष हा सुरक्षित असला पाहिजे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी लॉकर सुविधा वाढविण्याचा विचार झाल्यास याप्रकारच्या घटना घडणार नाहीत. वकील कक्ष आणि प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास अशा घटनांना आळा बसेल आणि चोरीच्या घटनांचा तपास करण्यासही मदत होईल. त्यामुळे बार असोसिएशनने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.




