हिंदवी न्यूज | आळंदी
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटनासाठी गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या इयत्ता ११वी-१२वी विज्ञान शाखेतील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी बुडाले.
या दुर्घटनेत यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
दुर्घटनेनंतर सर्व मृतदेह सापडले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे आळंदीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




