हिंदवी न्यूज | पिंपरी
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या कळसुबाई शिखरावर (समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर) हॅप्पी फॅमिली ट्रेकर्स असोसिएशनच्या २० शिलेदारांनी यापूर्वी किल्ले राजगड, तोरणा, रायगड, ब्रह्मगिरी, अंजनेरी तर आता कळसुबाई येथे यशस्वी चढाई करून एक नवा इतिहास रचला आहे.
दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. हातात टॉर्च, डोक्यावर हेडलॅम्प आणि मनात जिद्द घेऊन सर्व ट्रेकर्सनी बारी गावातून चढाईला प्रारंभ केला. थंडी, दाट धुके आणि खडतर चढण अशा अनेक अडचणीवर मात करत सकाळी १० वाजता सर्व ट्रेकर्स कळसुबाई मंदिर परिसरात पोहोचले. शिखरावर पोहोचताच सर्वांनी “हर हर महादेव” “जय महाराष्ट्र” चा जयघोष केला. ही मोहीम फक्त ट्रेक नव्हता, तर आरोग्य, एकी आणि निसर्गप्रेमाचा संगम होता, अशा भावना यावेळी ट्रेकर्सनी व्यक्त केल्या.
*मोहिमेत सहभागी मान्यवर:
इंडो अथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अँड. गजानन खैरे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, भारत फोर्ज मधील अधिकारी दत्तात्रय कदम, पोलीस अधिकारी श्रीरंग निगडे, उद्योजक पांडुरंग सोनवणे, उद्योजक सुदेश कोलते, पुणे जिल्हा परिषद चे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, टाटा मोटर्स मधील अधिकारी संजय कदम दाजी, बजाज ऑटो मधील अधिकारी युवराज जगताप, सहाय्यक वनसंरक्षक नितीश निगडे, अँड. शुभम कदम, अनुज खैरे, अभिषेक जगताप, चालुक्य खैरे, दिशा खैरे, राजवर्धन खैरे, ऋतुराज सोनवणे तर महिलांमध्ये सीमा जगताप, वैशाली कदम, वंदना कदम, रजनी खैरे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.
विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेचे अचूक नियोजन, मार्गदर्शन आणि लॉजिस्टिकची जबाबदारी वरील सर्व सदस्यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली. संस्थेचे प्रमुख विश्वस्त उद्योजक देवानंद कदम यांच्या नियोजनामुळे कोणतीही अडचण न येता मोहीम १००% यशस्वी झाली. यावेळी बोलताना असोसिएशनचे सदस्य गजानन खैरे म्हणाले, “कळसुबाई म्हणजे फक्त ट्रेक नाही, ती एक साधना आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. हॅप्पी फॅमिली ट्रेकर्स असोसिएशन फक्त कुटुंबाला एकत्र आणत नाही, तर महाराष्ट्राच्या कणखर सह्याद्रीची ओळख नव्या पिढीला करून देते.
संस्थेच्या वतीने लवकरच पुढील मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असून, निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.




