प्रत्येक हृदयातून सेवेचा आणि मानवतेचा शुभारंभ व्हावा !— निरंकारी राजपिता रमितजी
हिंदवी न्यूज | पिंपरी
विविधतेने नटलेल्या या जगात आपली रूपे, भाषा आणि जीवनशैली वेगवेगळी असली, तरी या बाह्य भिन्नतेच्या पलीकडे असलेली चेतना एकच आहे. आपण सर्वजण या परमात्म्याचीच लेकरे आहोत. सत्गुरूंनी आपणा सर्वांना प्रेमाच्या अदृश्य धाग्याने जोडून मानवतेच्या एकतेचा संदेश दिला आहे. संत निरंकारी मिशन हीच भावना ‘वसुधैव कुटुंबकम्’—‘संपूर्ण विश्व एक परिवार’ या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात साकारत आहे. येथे प्रेम हा केवळ विचार नसून, तो जीवन जगण्याची कला रुपात प्रत्ययास येत आहे.
७९वा वार्षिक निरंकारी संत समागम, परम आदरणीय सत्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हरियाणातील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. आत्मिक जागृती आणि मानवतेच्या एकतेचा संदेश हृदयात घेऊन देश-विदेशातून लाखो श्रद्धाळू भक्त या समागमात सहभागी झाले होते. पुणे, पिंपरी चिंचवड मधून शेकडो सेवादार यांनी समागमस्थळी जाऊन सेवा रुजू केली.
समागमाच्या सेवांचा शुभारंभ श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाने भारलेल्या वातावरणात झाला. निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन हस्ते सेवा स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मिशनच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य, केंद्रीय सेवादलाचे अधिकारी तसेच हजारो श्रद्धाळू भक्तांनी प्रेम आणि निष्ठेने सेवेत सहभाग घेतला. संत निरंकारी मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय राजकुमारी ‘मामीजी’ आणि संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजा यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून निरंकारी राजपिताजींचे हार्दिक स्वागत केले. हा पावन प्रसंग सेवा ही साधना मानून, समर्पणाला जीवनाचा आधार बनविण्याची प्रेरणा देणारा ठरला.
७९व्या संत समागमाच्या सेवांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित श्रद्धाळूंना संबोधित करताना निरंकारी राजपिताजींनी सत्गुरू माताजींचे प्रेम आणि आशीर्वाद संतांपर्यंत पोहोचवत सांगितले की, संत समागमाच्या सेवांचे हे विशाल स्वरूप असंख्य संतांच्या निःस्वार्थ सेवा, त्याग आणि समर्पणाचे फलित आहे. यातूनच आपल्या जीवनातही सेवा आणि परोपकाराची भावना जागृत करण्याची प्रेरणा मिळते. मानवजन्म केवळ स्वतःसाठी नव्हे, तर इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी मिळाला आहे. सेवेतून ‘मी’ची भावना संपून ‘आपण’ची भावना निर्माण होते, तेव्हाच सेवेचा खरा अर्थ प्रकट होतो. सत्गुरूंचे ज्ञान हीच ती जागृती आहे, जी आपली दृष्टी बदलून प्रत्येक मानवामध्ये निरंकाराचे स्वरूप पाहण्याची प्रेरणा देते. जेव्हा मानव मानवावर प्रेम करेल आणि त्याचा सन्मान करेल, तेव्हा ही धरती अधिक सुंदर बनेल. सत्गुरूंच्या चरणी हीच प्रार्थना आहे की, आपण केवळ मानव म्हणून नव्हे, तर आपल्या कर्मातून आणि वर्तनातूनही खऱ्या अर्थाने मानव बनू शकू.
यंदाच्या संत समागमाची ‘जागृती’ ही संकल्पना असून, ती मनुष्याला बाह्य जगापासून अंतर्मुख होऊन स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची आणि आपल्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून घेण्याची प्रेरणा देते. सत्गुरू माताजींनीही सांगितले आहे की, जागरूक आणि सजगतेने, भक्त प्रत्येक क्षणी भक्तीमध्ये तल्लीन राहतात. ‘जागृती’ म्हणजे एखाद्या नव्या गोष्टीची अचानक जाणीव होणे नव्हे, तर प्रत्येक क्षणी स्वतःच्या अंतरंगात सजग आणि सचेत राहणे होय. संसारात राहूनही त्याच्या प्रभावापासून स्वतःला अलिप्त ठेवणे आणि प्रत्येक परिस्थितीत प्रभुस्मरणाशी जोडलेले राहणे, हीच खरी ‘जागृती’ आहे.




